कौशांबी,
Kaushambi explosion प्रयागराज-कौशांबी सीमेवरील मनौरीजवळ चिल्ला शाहबाजी गावात बेकायदा सुरू असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटाची तीव्रता वाढतच असून, या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता १४ वर पोहोचली आहे. स्फोटात गंभीर जखमी झालेल्या १६ वर्षीय उर्वशीचा बुधवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वशीवर स्वरूप राणी नेहरू रुग्णालयात उपचार सुरू होते.सोमवारी घडलेल्या या दुर्घटनेत सुरुवातीला ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारी आणखी दोघांनी उपचारादरम्यान प्राण गमावले. बुधवारी उर्वशीचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १४ झाला आहे. या घटनेत जखमी झालेल्या आणखी तीन जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.

स्फोटानंतर गावातील पोलीस आणि प्रशासनाकडून ढिगारा हटवण्याचे काम सुरू असून, त्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे. दुसरीकडे, मृतांच्या कुटुंबीयांकडूनही ढिगाऱ्याखाली दबलेल्या मौल्यवान वस्तू शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे दुर्घटनास्थळी बचाव आणि शोधमोहीम अद्याप सुरू आहे. या प्रकरणात कारखान्याच्या परवान्याबाबतही गंभीर बाब समोर आली आहे. संबंधित फटाका कारखान्याचा परवाना दोन वर्षांपूर्वीच रद्द करण्यात आला होता. तरीही तेथे फटाक्यांचे उत्पादन सुरूच असल्याचे समोर आले. या प्रकरणातील निष्काळजीपणाची दखल घेत नऊ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, कारखान्याचा मालक नौशाद याला सोमवारी रात्री उशिरा चकमकीनंतर पोलिसांनी अटक केली आहे.