अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन देताय... तर सावधान!

पालकांना ३० हजारांचा फटका ; वाहतूक पोलिसांची आक्रमक भूमिका

    दिनांक :02-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर,
nagpur traffic police अल्पवयीन मुलाच्या हाती दुचाकी किंवा चारचाकी बिनधास्तपणे देणाऱ्या पालकांनी आता सावध होण्याची गरज आहे. अल्पवयीन मुलगा वाहन चालविताना आढळून आल्यास संबंधित पालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत असून, तब्बल ३० हजार रुपयांचा दंड भरावा लागत आहे. त्यामुळे मुलाला वाहन देणे पालकांच्या खिशाला चांगलेच महागात पडत आहे. नागपूर वाहतूक पोलिसांनी अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या नियमभंगाला आळा घालण्यासाठी कारवाईचा धडाका सुरू केला आहे.
 

nagpur police 
 
 
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, वाहतूक कोंडी कमी व्हावी तसेच रस्त्यांवरील अपघातांना आळा बसावा, यासाठी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध अभियान राबविण्यात येत आहेत. सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे ट्रीपल सीट, रॉंग साईड आणि विना हेल्मेट वाहनचालक वाहतूक पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यासोबतच अल्पवयीन वाहनचालकांवरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अनेक पालक मुलांच्या हातात दुचाकी किंवा कार देतात. मात्र, अशा प्रकारे वाहन चालविताना अपघात झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी आता केवळ मुलाला अडविण्यापुरती कारवाई न करता पालकांनाही पोलिस ठाण्यात बोलावून जबाबदारी निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे पालकांमध्येही वचक निर्माण झाला असून, अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देण्याचे प्रमाण कमी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत सोनेगाव वाहतूक पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत सर्वाधिक कारवाई करून वचक निर्माण केला आहे.

‘रॉंग साईड’ थेट गुन्हा दाखल
रॉंग साईड वाहन चालविणे हा वाहतुकीतील सर्वात धोकादायक प्रकार मानला जातो. वेळ वाचविण्यासाठी किंवा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहनचालक नियम धाब्यावर बसवून विरुद्ध दिशेने वाहन चालवितात. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावावा लागतो आणि अनेकदा गंभीर अपघात घडतात. त्यामुळे रॉंग साईड वाहनचालकांवरही वाहतूक पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल करणे सुरु केले आहे.
सोनेगावमध्ये सर्वाधिक कारवाया
 
 
एक अल्पवयीन मुलाची कार थांबवून त्याचे वडिल प्रमोद यांना ३० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच दोन अल्पवयीन दुचाकीचालक मुलांच्या पालकांनाही ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला. एकाच दिवशी जवळपास ८ कारवाई करीत प्रत्येकी ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. अशाप्रकारे आतापर्यत २४ वर अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई केल्याची माहिती सोनेगाव वाहतूक परिमंडळचे प्रमुख प्रशांत पांडे यांनी दिली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना केवळ दंड वसूल करणे हा पोलिसांचा उद्देश नाही. नागरिकांनी नियमांचे पालन करून सुरक्षितपणे वाहन चालवावे आणि शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. "कारवाईचा उद्देश केवळ दंड वसूल करणे नसून वाहतुकीला शिस्त लावणे हा आहे.
 
 
 

grth 
                                                                                 आदित्य मिरखेलकर