मानोरा,
pohradevi बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज, जगदंबा माता, सामकी माता (उमरीगड) व डॉ. रामराव महाराज यांचे तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी नगरीला आता बुलढाणा जिल्ह्यातून थेट बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या नवीन बस सेवेचा विधिवत शुभारंभ धर्मगुरूंच्या हस्ते करण्यात आला.
बुलढाणा आगारातून पोहरादेवीसाठी ही नियमित फेरी सुरू झाली असून, बुलढाण्यावरून दुपारी १ वाजता निघून सायंकाळी ७ वाजता पोहरादेवीला पोहोचणारी ही निवासी बस आहे. आज सकाळी पोहरादेवी येथून बुलढाण्यासाठी ही बस सोडण्यात आली. पोहरादेवी, धानोरा, वाशीम, मालेगाव, मेडशी, पातुर ,बाळापूर, पळशी, आंबेटाकळी, लाखनवाडा चिंचपूर मार्गे बुलढाणा असा या बसचा प्रवास राहणार आहे. या नवीन सेवेचा शुभारंभ धर्मगुरू आ. बाबूसिंग महाराज राठोड, महंत गणेश महाराज, विश्वस्त गोपाल महाराज, सदाशिव चव्हाण आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले भक्तगण व प्रवाशांच्या उपस्थितीत करण्यात आला. महाराजांच्या हस्ते बसचे पूजन करून नारळ फोडण्यात आला व चालक-वाहक यांचा सत्कार करण्यात आला. या पूजन सोहळ्याला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
बुलढाणा जिल्ह्यातील हजारो भाविकांना पोहरादेवीच्या दर्शनासाठी येणे आता सोयीचे होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही थेट बस सेवा सुरू करण्याची मागणी होती, ती अखेर पूर्ण झाल्याने भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.