हजारो भक्तांचा मिरवणूकीत सहभाग
वाशीम,
bappa-in-washim-city पवित्रता, मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या श्री विघ्नहर्ता गणरायाला शुक्रवार, २५ सप्टेंबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...’ च्या जयघोषात भावपूर्ण निरोप देण्यात आला. गत १२ दिवसांपासून वाशीम शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांसह घराघरांत विराजमान झालेल्या गणरायाच्या विसर्जनासाठी शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

वाशीम शहरातील पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून उत्साहात सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन खासदार संजय देशमुख, आमदार शाम खोडे, आमदार किरण सरनाईक, माजी आमदार अॅड. विजय जाधव, राजू पाटील राजे, नगराध्यक्ष अनिल केंदळे, जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मिरवणुकीतील मानाच्या जय शंकर गणेशमूर्तींचे पूजन करून विसर्जन शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत २२ पेक्षा अधिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला. विविध मंडळांनी ढोल-ताशा पथक, आखाडे तसेच विविध धार्मिक आणि सामाजिक विषयांवरील आकर्षक झांया सादर केल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवशंकर गणेशोत्सव मंडळाने प्रथम क्रमांकाचे आकर्षण कायम राखले. मिरवणूक विसर्जन शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू होऊन बालू चौक, शिव चौक, दिघेवाडी चौक, राजणी चौक, मन्नासिंह चौक, महाराणा प्रताप चौक, माहुरवेस, दंडे चौक, काटीवेस मार्गे पुन्हा बालू चौक आणि त्यानंतर देवतलाव येथे पोहोचली. शहरातील विविध भागातून गणेशभक्त पायी तसेच रिक्षा, दुचाकी, ट्रॅटर, ट्रक आणि चारचाकी वाहनामधून विसर्जनासाठी दाखल झाले होते. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी गणेशभक्तांसाठी चणा, खिचडी आदी प्रसादाचे वितरण करण्यात आले.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अनेक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या आकाराच्या आकर्षक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत या भव्य मूर्ती भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरल्या. काही मंडळांनी धार्मिक झाया सादर केल्या, तर शिवशंकर गणेशोत्सव मंडळासमोर महिला व युवतींनी ढोल-ताशांचा ठेका धरत उत्साहात सहभाग नोंदविला. इतर मंडळांसमोर युवक, बालिका आणि लहान मुलांनी आखाड्यांचे विविध प्रयोग सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. गणेश विसर्जन पाहण्यासाठी वाशीम शहरासह परिसरातून हजारो नागरिक कुटुंबासह सहभागी झाले होते. यंदाच्या मिरवणुकीत गुलालाऐवजी झेंडूच्या फुलांचा वापर करण्यात आला. त्यामुळे मिरवणुकीला पारंपरिक आणि भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले.
शुक्रवारी सकाळपासूनच गणेशमूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात झाली होती. लहान गणेशमूर्तींचे विसर्जन जुन्या नगर परिषद परिसरात तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावात करण्यात आले. मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन मात्र रात्री उशिरा करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश विसर्जन शोभायात्रेसाठी शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणूक मार्गावरील विविध ठिकाणी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात आले.पोलिस प्रशासन, नगर परिषद आणि संबंधित यंत्रणांच्या नियोजनामुळे गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली. ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...’च्या जयघोषात भाविकांनी लाडया गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.
हेडा परिवाराच्या वतीने महाप्रसाद
स्व. शंकरलालजी हेडा स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हेडा परिवाराच्या वतीने येथील नगर परिषद चौकात गणेश मंडळ व भक्तांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. हेडा परिवाराच्या वतीने दरवर्षीच गणेश मंडळ व मिरवणूकीत सहभागी भक्तांसाठी महाप्रसाद ठेवण्यात येतो. या महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तांनी घेतला. यावेळी धार्मिक कार्यक्रमाने वातावरण अधिकच प्रसन्न झाले होते. स्थानिक नागरिक आणि ग्रामीण ग्रामस्थ, युवक मंडळे, हेडा परिवारातील महिला यांनीही या सोहळ्यात सक्रिय सहभाग घेऊन भाविकांची सेवा केली. महाप्रसाद वितरण यशस्वी करण्यासाठी कुटुंबाच्या वतीने माजी नगराध्यक्ष अशोक शंकरलाल हेडा, पूनम अशोक हेडा, युवा उधोजक दिलीप हेडा, कविता दिलीप हेडा, एच टू एम चे संचालक रोहित हेडा, रसिका रोहित हेडा, कुणाल हेडा, मयुरी कुणाल हेडा यांनी परिश्रम घेतले.