मुंबई
samay raina ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’च्या आगामी एपिसोडची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या भागात बॉलिवूड अभिनेत्री मेधा शंकर, अभिनेता वरुण धवन आणि शेरॉन वर्मा हे पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, मेधा शंकरचं नाव गेल्या काही काळापासून शोचा होस्ट समय रैनासोबत जोडलं जात आहे. त्यामुळे आगामी एपिसोडमध्ये दोघे एकत्र दिसणार असल्याने त्यांच्या कथित नात्याबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
मागील एपिसोडमध्ये झालेल्या बिहारी-काश्मिरी वादामुळे समय रैना अडचणीत आला होता. या वादानंतर आता तो नव्या एपिसोडसह पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या प्रत्येक नव्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. आगामी भागात कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार, याचा खुलासाही आता झाला आहे.
मेधा शंकर आणि समय रैना गेल्या काही काळापासून त्यांच्या कथित रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. दोघे डेट करत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी दोघांना एका फ्लाइटमध्ये एकत्र पाहण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबई विमानतळावरही ते एकत्र दिसले. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर दोघांच्या नात्याबाबतच्या चर्चांना पुन्हा जोर आला.
यापूर्वी जुलै 2026 मध्येही मेधा आणि समय काही कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. दोघे वारंवार एकत्र दिसत असल्याने चाहते त्यांच्या नात्याबाबत वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. मात्र, समय रैना किंवा मेधा शंकर यांनी अद्याप त्यांच्या नात्याबाबत कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही.
दरम्यान, ‘इंडियाज गॉट लेटेंट 2’च्या आगामी एपिसोडचा प्रोमोही समोर आला आहे. या प्रोमोमध्ये मेधा शंकर समय रैनाच्या शेजारी बसलेली दिसत आहे. त्यांच्यासोबत शोमधील इतर पाहुणेही पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे, हा एपिसोड Netflix आणि समय रैनाच्या YouTube चॅनेलवर स्ट्रीम केला जाणार आहे.त्यामुळे या भागात मेधा आणि समयच्या कथित रिलेशनशिपवर एखादा प्रश्न विचारला जातो का किंवा त्यावर काही मजेशीर टिप्पणी केली जाते का, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. डेटिंगच्या चर्चांवर दोघे काही खुलासा करणार का, की नेहमीप्रमाणे हा प्रश्नही विनोदी पद्धतीने टाळणार, हे पाहणं आता रंजक ठरणार आहे.