मुंबई
suraj chavan ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता सूरज चव्हाण याच्या आयुष्यात आनंदाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. सूरज आणि त्याची पत्नी संजना यांच्या संसारात चिमुकल्या पावलांनी गोंडस पाहुणीचे आगमन झाले आहे. जन्माष्टमीच्या पावन दिवशी सूरजच्या घरी कन्यारत्नाचा जन्म झाला असून, तिचे नाव राधा ठेवण्यात आले आहे. लेकीच्या आगमनाने चव्हाण कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, चाहत्यांकडूनही सूरजवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डिसेंबर 2025 मध्ये सूरज चव्हाणचा संजनासोबत विवाह झाला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी सूरज बाबा होणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने संजनाच्या चोर ओटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर सूरज आणि संजना आई-बाबा होणार असल्याची बातमी समोर आली. पुढे स्वतः सूरज आणि संजना यांनीही ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.
गर्भावस्थेदरम्यान संजनाने बेबी बंपसह काही व्हिडीओही शेअर केले होते. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी तिचे थाटामाटात डोहाळे जेवण पार पडले होते. या संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनात मराठी अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने स्वतः जातीनं लक्ष घातले होते. संजनाच्या डोहाळे जेवणाचा संपूर्ण कार्यक्रम जान्हवीने आयोजित केला होता.
लग्नानंतर अवघ्या नऊ महिन्यांनी suraj chavan सूरज आणि संजना यांच्या आयुष्यात हा आनंदाचा क्षण आला असून, दोघेही आई-बाबा झाले आहेत. कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर सूरजचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. लेकीच्या जन्मानंतर रुग्णालयातील सूरज चव्हाणचा पहिला व्हिडीओही समोर आला असून, त्यातून त्याचा आनंद स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. चिमुकल्या राधाच्या आगमनाने सूरज-संजनाच्या आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.