दुबई,
shafalis historic feat पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने ७ गडी राखून विजय मिळवत महिला टी-२० आशिया कपमधील आपला अंतिम गट सामना जिंकला. या सामन्यात भारताची युवा सलामीवीर शेफाली वर्माने केवळ १२ धावांची खेळी केली असली, तरी या छोट्याशा खेळीमुळे तिच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद झाली. शेफालीने महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ हजार धावांचा टप्पा पार केला. विशेष म्हणजे, आयर्लंडची गॅबी लुईस हिचा विक्रम मागे टाकत ही कामगिरी करणारी शेफाली सर्वात कमी वयाची खेळाडू ठरली आहे.

शेफालीने आपल्या कारकिर्दीतील ११४व्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात हा पराक्रम केला. आतापर्यंत तिने ११३ डावांमध्ये २८.०८च्या सरासरीने ३,०५५ धावा केल्या आहेत. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारी ती भारताची तिसरी खेळाडू ठरली आहे. तिच्याआधी स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांनी हा टप्पा गाठला आहे. मात्र, वयाच्या २२ वर्षे २२० दिवसांमध्ये ३ हजार धावा पूर्ण करून शेफालीने या विक्रमाच्या यादीत सर्वांनाच मागे टाकले. गॅबी लुईसने हा टप्पा २४ वर्षे ३४७ दिवसांच्या वयात, तर यूएईच्या इशा ओझाने २७ वर्षे १३९ दिवसांच्या वयात गाठला होता. स्मृती मंधानाने २७ वर्षे १७१ दिवस आणि वेस्ट इंडिजच्या हेली मॅथ्यूजने २७ वर्षे ३४७ दिवसांच्या वयात ३ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.
पाकिस्तानविरुद्धच्या याच सामन्यात शेफालीने आणखी एका विक्रमाची नोंद केली. भारताला ५६ धावांचे लक्ष्य मिळाल्यानंतर डावाची सुरुवात करताना तिने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर दोन वेळा षटकार मारणारी शेफाली वर्मा पहिली खेळाडू ठरली आहे. यापूर्वी २०२६ मध्ये एडजबॅस्टन स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात तिने सादिया इक्बालच्या गोलंदाजीवर डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला होता. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शेफालीने आपल्या नावावर एकाच वेळी दोन महत्त्वाच्या विक्रमांची नोंद केली.