एटीएफच्या दरवाढीचा फटका; सोलापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा बंद

    दिनांक :06-Sep-2026
Total Views |
सोलापूर
solapur-mumbai flight service विमान इंधन अर्थात एटीएफच्या किमतीत झालेल्या विक्रमी वाढीचा फटका सोलापूर-मुंबई विमानसेवेला बसला असून, स्टार एअरने ही सेवा पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मार्गावरील वाढता आर्थिक तोटा सहन करणे अशक्य झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले असून, यासंदर्भातील अधिकृत पत्र सोलापूर जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी कंपनीकडे या निर्णयाबाबत स्पष्टीकरण मागितल्यानंतर स्टार एअरने वाढता इंधन खर्च हे सेवा बंद करण्यामागील प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट केले आहे.
 

solapur-mumbai flight service suspended as atf prices surge, star air cites heavy losses 
फेब्रुवारी २०२६मध्ये विमान इंधनाचा दर सुमारे ६० रुपये प्रतिलिटर होता. मात्र, सप्टेंबर २०२६मध्ये हाच दर तब्बल १२२ रुपये प्रतिलिटरवर पोहोचला आहे. अवघ्या काही महिन्यांत इंधनाच्या किमती जवळपास दुप्पट झाल्याने लहान विमानांचे संचालन करणे कंपनीसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत अडचणीचे ठरत आहे. सोलापूर-मुंबई मार्गावर दरमहा मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याचे स्टार एअरने जिल्हा प्रशासनाला दिलेल्या खुलाशात नमूद केले आहे.
वाढत्या इंधन दरांचा परिणाम केवळ सोलापूर-मुंबई मार्गापुरता मर्यादित राहिलेला नाही. मागील दोन वर्षांपासून संपूर्ण विमान वाहतूक क्षेत्र विविध आव्हानांना सामोरे जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे देशभरातील एकूण आठ हवाई मार्ग बंद करावे लागल्याचे स्टार एअरने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातील नांदेड-मुंबई आणि बेळगाव-मुंबई या मार्गांचाही त्यात समावेश आहे. याशिवाय गुजरात आणि ओडिशा राज्यांमधील काही विमानसेवाही बंद करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारकडून स्टार एअरला  solapur-mumbai flight service विविध निधी आणि इतर माध्यमांतून मदत देण्यात आली होती. या शासकीय सहकार्यामुळे कंपनीला काही प्रमाणात होणारा आर्थिक तोटा भरून काढण्यास मदत झाली. मात्र, विमान इंधनाचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने सरकारी मदत मिळूनही संबंधित मार्गांवरील सेवा आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठेवणे शक्य नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
स्टार एअरने सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने सोलापूरच्या प्रवाशांना पुन्हा एकदा हवाई वाहतुकीच्या सुविधेपासून वंचित राहावे लागणार आहे. इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे प्रादेशिक विमानसेवांपुढे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींचे हे आणखी एक ठळक उदाहरण ठरले आहे.