पोलिसांच्या मदतीने अखेर ‘त्या’ पित्यावर अंत्यसंसार

बेवारस म्हणून पुरला होता मृतदेह : ओळख पटल्यानंतर महिन्याभरानंतर दिला मुखाग्नी

    दिनांक :07-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
nagpur news रस्त्यावरच मृत पावलेल्या वृध्दावर बेवारस समजून पोलिसांनी अंत्यविधी केली. मात्र, महिन्याभरानंतर त्याची ओळख पटल्याने कुटुंबीयांनी विधीवत अंत्यसंस्कार केले. यात कपिलनगर पोलिसांची महत्वपूर्ण सहकार्य लाभले. ही घटना कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. पोलिसांच्या या कर्तव्य तत्परतेमुळे एका कुटुंबाला रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करता आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी ठाणेदार सतीश आडे यांचे शतश: आभार मानले.
 

nagpur news: police help family perform last rites of father buried as unidentified body 
शेषराव ( वय ७२) यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. ते खामला परिसरात कुटुंबीयांसोबत राहतात. वडिल शेषराव यांचे तिनही मुलींवर खूप प्रेम होते. त्यामुळे ते लकडगंज परिसरात राहणाऱ्या मुलीच्या भेटीसाठी घरातून बाहेर पडले. त्यांची रस्त्यातच प्रकृती बिघडली. कुणीतरी त्यांना कपिलनगर चौकात सोडले. काही वेळातच त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. कपिलनगर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र, मृतदेहाचे नातेवाईक किंवा कुटुंबीयांची ओळख पटली नाही. कायद्यानुसार अनोळखी मृतदेहाची तीन दिवसांनंतर विल्हेवाट लावण्यात आली. मृतदेह मोक्षधाम घाटावर पुरण्यात आला. दुसरीकडे शेषराव यांच्या मुली आणि मुलाने पोलिस ठाण्यात वडिल मिसींग झाल्याची नोंद केली. कपिलनगरचे ठाणेदार सतीश आडे यांनी त्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावले. त्यांना फोटो मृत व्यक्तीचे फोटो दाखवले. त्यांनी ओळख पटवली. शेषराव यांचे कुटुंबीयांनी शेषराव यांच्यावर धार्मिक पूजा-अर्चा करुन विधीवत अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले.
करावा लागला संघर्ष
कुटुंबीयांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढून विधीवत धार्मिक रितिरीवाजानुसार अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. पुरलेला मृतेदह उकरुन मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार करायचा होता. त्यांना ठाणेदार सतीश आडे यांनी मदत केली. त्यांनी कायद्यानुसार तहसीलदारांशी पत्रव्यवहार केला. तहसीलदारांनी लगेच सकारात्मक दखल घेततली. पुरलेला मृतदेह तहसीलदार आणि पोलिसांच्या समक्ष काढण्यात आला. कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.
कुटुंबीयांच्या भावनेचा आदर
पुरलेला मृतदेह ताब्यात घेऊन मुखाग्नी देण्यासाठी सरणावर ठेवण्यात आला. तीनही मुली आणि मुलांनी धार्मिक पूजा-अर्चना केली. यावेळी कुटुंबीयांसाठी भावनिक क्षण होता. तसेच पोलिसांसाठी कर्तव्य बजावणारा. मात्र, एकीकडे कुटुंबीयांचे वडिलांप्रती प्रेम आणि भावना होत्या तर दुसरीकडे खाकी वर्दीतील कर्तव्य झळकत होते. यावेळी ठाणेदार सतीश आडे यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करीत सहवेदना व्यक्त केली.a