मुंबई,
Sanjay Raut महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला आणि प्रतीक्षेचा विषय ठरलेला क्षण आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये एकत्र येणार असल्याचे स्पष्ट संकेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. दोन भावांमधील मतभेद संपून मनोमिलन झाले असून, युतीची अधिकृत घोषणा आता केवळ औपचारिकतेपुरती उरली असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी नुकत्याच दिलेल्या प्रसारमाध्यमांशी संवादात या घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू होत असून, त्याआधीच शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीची अधिकृत घोषणा वाजत-गाजत केली जाईल, असा दावा त्यांनी केला. सध्या जागावाटपाबाबतच्या चर्चा अंतिम टप्प्यात असून, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि कल्याण-डोंबिवली यांसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावर अंतिम निर्णय घेतला जात आहे.
महायुतीवर जोरदार टीका
दरम्यान, नुकत्याच Sanjay Raut झालेल्या नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांवर भाष्य करताना राऊत यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली. काही ठिकाणी प्रचंड पैसा वापरून निकाल आपल्या बाजूने वळवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “काही नाटकांमध्ये मालक स्वतःच तिकिटे खरेदी करून ‘हाऊसफुल्ल’चे फलक लावतात; कालचा निकालही तसाच होता. तो खरा हाऊसफुल्ल शो नव्हता, तर तसा दाखवण्यात आला,” असा टोला त्यांनी लगावला. मात्र राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्र येणे हे कोणतेही नाटक नसून तो ‘प्रितीसंगम’ आहे आणि महाराष्ट्राची जनता या प्रितीसंगमाला मोठा प्रतिसाद देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून कोट्यवधी रुपयांचा वापर झाल्याचा आरोपही राऊत यांनी केला. “हा पैसा कुठून आला, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हा जनतेचाच पैसा आहे. आम्ही पैशाच्या बळावर नाही, तर जनतेच्या विश्वासावर आणि ‘ठाकरे’ या नावाच्या ताकदीवर निवडणूक लढवणार आहोत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
ही प्रस्तावित युती Sanjay Raut केवळ मुंबईपुरती मर्यादित न राहता नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि पुणे यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही प्रभाव टाकेल, असा दावा केला जात आहे. अर्ज भरण्यापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.