मुंबई
ujjwal nikam बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव सध्या आपल्या आगामी ‘प्रहार’ या चित्रपटामुळे चर्चेत असून, या चित्रपटात त्यांनी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची चर्चा सुरू असतानाच उज्ज्वल निकम यांनी 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट आणि अभिनेता संजय दत्त यांच्याशी संबंधित प्रकरणावर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. त्यांनी त्या काळातील घटनांचा उल्लेख करत संजय दत्त यांच्याविषयी आपले मत मांडले.
संजय दत्त 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट रोखू शकला असता का, असा प्रश्न निकम यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, बॉम्बस्फोट होण्यापूर्वी अबू सालेम एका टेम्पोमधून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे घेऊन आला होता. या शस्त्रांमध्ये अनेक हँड ग्रेनेड आणि एके-47 रायफल्सचा समावेश होता. त्यापैकी काही शस्त्रे संजय दत्त यांनी स्वतःजवळ ठेवली होती. तसेच, त्यांच्याकडे असलेले हँड ग्रेनेड त्यांनी नंतर परत केल्याची माहितीही निकम यांनी यावेळी दिली.यापुढे बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, संजय दत्त यांना या शस्त्रांबाबत माहिती होती. त्यांनी त्याच वेळी ही माहिती पोलिसांना दिली असती, तर परिस्थिती पूर्णपणे वेगळी असू शकली असती. पोलिसांनी तातडीने कारवाई केली असती आणि मुंबईतील बॉम्बस्फोट रोखण्याची शक्यता निर्माण झाली असती. इतकेच नव्हे, तर या कटात सहभागी असलेल्या सर्व आरोपींना अटक करून संपूर्ण कटाचा भंडाफोडही करता आला असता, ujjwal nikam असे मत त्यांनी व्यक्त केले.दरम्यान, आपले मत मांडताना उज्ज्वल निकम यांनी एक महत्त्वाची बाब स्पष्ट केली. संजय दत्त हे दहशतवादी नव्हते आणि दहशतवादी हल्ला घडवून आणणे हा त्यांचा हेतूही नव्हता, असे त्यांनी ठामपणे सांगितले. मात्र, त्यांच्या माहितीचा योग्य वेळी पोलिसांना उपयोग झाला असता, तर 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोट टाळण्याची शक्यता होती, असा दावा त्यांनी या मुलाखतीत केला.