द्रविड बनणार इंग्लंडचा कोच?

    दिनांक :13-Jul-2026
Total Views |
इंग्लंड,
will dravid become englands coach मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका १-२ अशा फरकाने गमावल्यानंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅककुलम यांना कसोटी संघाच्या प्रशिक्षकपदावरून हटवण्यात आले असून, त्यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळाची समाप्ती झाली आहे. आता इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ईसीबी) नव्या कसोटी प्रशिक्षकाच्या शोधात असून, भारतीय क्रिकेटमधील दिग्गज राहुल द्रविड यांचे नाव प्रमुख दावेदारांमध्ये समोर आले आहे.
 
 
will dravid become englands coach
 
'डेली टेलिग्राफ'च्या वृत्तानुसार, इंग्लंड क्रिकेट बोर्ड पुढील वर्षी होणाऱ्या ॲशेस मालिकेची तयारी लक्षात घेऊन कसोटी संघासाठी नवीन नेतृत्वाची निवड करण्याच्या तयारीत आहे. मात्र, ब्रेंडन मॅककुलम हे एकदिवसीय आणि टी-२० संघांचे मुख्य प्रशिक्षक म्हणून आपल्या भूमिकेत कायम राहणार आहेत.
 
५३ वर्षीय राहुल द्रविड यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला, तसेच २०२३ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही स्थान मिळवले होते. क्रिकेटमधील सखोल ज्ञान, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि युवा खेळाडूंना घडवण्याची क्षमता यामुळे द्रविड यांना इंग्लंडच्या कसोटी प्रशिक्षकपदासाठी सक्षम उमेदवार मानले जात आहे.
 
तथापि, अहवालानुसार राहुल द्रविड यांची सध्या पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून काम करण्याची इच्छा नाही. असे असले तरी, इंग्लंडच्या कसोटी संघाचे प्रशिक्षकपद स्वीकारल्यास त्यांना कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याबरोबरच आपल्या आवडत्या कसोटी क्रिकेटशी जोडलेले राहण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे ईसीबी त्यांच्याशी किमान एकदा तरी चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
भारतीय वरिष्ठ संघाचे प्रशिक्षक होण्यापूर्वी द्रविड यांनी भारताच्या १९ वर्षांखालील संघाला मार्गदर्शन केले होते. तसेच बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्येही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. युवा खेळाडूंना घडवण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो.
 
इंग्लंडच्या कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी झिम्बाब्वेचे माजी दिग्गज अँडी फ्लॉवर यांच्याही नावाची जोरदार चर्चा आहे. इंग्लंडला तीन ॲशेस मालिका जिंकून देण्याबरोबरच कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर नेण्याचे श्रेय फ्लॉवर यांना जाते. याशिवाय इंग्लंडचे माजी फिरकीपटू रिचर्ड डॉसन, श्रीलंकेचे कुमार संगकारा, इंग्लंडचे अँड्र्यू फ्लिंटॉफ, पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन आणि ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक जस्टिन लँगर यांची नावेही संभाव्य उमेदवारांच्या यादीत असल्याचे वृत्तात म्हटले आहे.