लेख
World No Tobacco Day आज ३१ मे रोजी संपूर्ण जगभरात जागतिक तंबाखू निषेध दिवस साजरा केला जातो. तंबाखूच्या वापरामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक धोक्यांविषयी जागरूकता निर्माण करणे आणि तंबाखूचे सेवन कमी करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या वर्षीच्या जागतिक तंबाखू निषेध दिवसाची थीम आहे तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण तंबाखूच्या सेवनामुळे होणारे परिणाम अत्यंत गंभीर असतात. तंबाखूचे सेवन फुफ्फुसाचे कर्करोग, हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर अनेक जीवघेण्या आजारांचे प्रमुख कारण आहे. तंबाखूचे धुम्रपान करणे किंवा चघळणे या दोन्ही पद्धती शरीरासाठी घातक असतात. या व्यसनामुळे दरवर्षी लाखो लोक आपले प्राण गमावतात. भारतामध्ये तंबाखूचे सेवन मोठ्या प्रमाणावर आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, तंबाखूचे सेवन कमी करणे आणि ते पूर्णपणे थांबवणे ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. तंबाखूच्या वापराचे दुष्परिणाम फक्त वापरकर्त्यावरच नव्हे तर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांवरही होतात, विशेषतः मुलांवर. तंबाखूचा धूर, तंबाखूच्या उत्पादनांचा संपर्क आणि वापर यामुळे मुलांचे आरोग्य गंभीरपणे प्रभावित होते. तंबाखूच्या धुरामुळे मुलांना श्वसनाचे अनेक आजार होऊ शकतात.
हेही वाचा : कर्तृत्व शालिनी अहल्या बाई
हेही वाचा : बेछूट तरुणाईचे गंभीर प्रश्न धुरामुळे अस्थमा, ब्रॉन्कायटिस आणि फुफ्फुसांच्या इतर समस्या उद्भवू शकतात. मुलांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते आणि त्यांना वारंवार सर्दी, खोकला होण्याची शक्यता वाढते. तंबाखूच्या धुरामुळे मुलांच्या कानाच्या नळीत द्रव जमा होतो, ज्यामुळे कानाचे संसर्ग आणि इतर कानाचे आजार होऊ शकतात. हे संसर्ग दीर्घकालीन ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतात. तंबाखूच्या धुराचा संपर्क असलेल्या मुलांचे वजन कमी असू शकते आणि त्यांची वाढ खुंटू शकते. गर्भधारणेदरम्यान धुम्रपान केल्यास जन्मजात विकार, कमी जन्म वजन, आणि अकाली जन्म होण्याची शक्यता वाढते. तंबाखूच्या धुराचा सतत संपर्क मुलांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम करू शकतो. त्यांना चिडचिड, तणाव आणि शिकण्याच्या प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो. (World No Tobacco Day) तंबाखूच्या संपर्कात आलेल्या मुलांना पुढील आयुष्यात तंबाखूचे व्यसन लागण्याची शक्यता जास्त असते. त्यांच्या जवळच्या व्यक्ती तंबाखूचे सेवन करत असल्यास, ते त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. तंबाखूच्या वापराचे प्रोत्साहन मुलांवर सामाजिक दबाव टाकू शकते. त्यांना तंबाखूच्या सेवनाचे आकर्षण वाटू शकते आणि ते सामाजिक गटांत सामील होण्यासाठी तंबाखूचे सेवन करू शकतात. तंबाखूच्या धुरामुळे मुलांच्या भावनिक स्वास्थ्यावरही परिणाम होतो. त्यांना चिंता, तणाव, आणि आत्मविश्वास कमी होण्याचा सामना करावा लागू शकतो. त्यांच्या आत्मसन्मानावरही परिणाम होऊ शकतो. तंबाखूच्या उत्पादनांपासून मुलांचे संरक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण मुलांचे आरोग्य व भवितव्य आपल्यावर अवलंबून आहे.
हेही वाचा : कन्याकुमारीमध्ये पंतप्रधान मोदींचा दुसरा दिवस, VIDEO
तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी तंबाखूविरोधी कायद्यांचे कठोरपणे पालन, तंबाखूविरोधी शिक्षण, जाहिरातींवर बंदी, उत्पादकांवर कठोर नियम, आणि तंबाखूविरोधी सामाजिक मोहिमा राबविणे गरजेचे आहे. येथे काही महत्त्वाच्या मुद्द्यांची चर्चा करू या, ज्यामुळे आपण तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण करू शकतो. महाविध्यालयात या दिवशी विविध उपक्रमांचे आयोजन करून जनतेमध्ये तंबाखूविरोधी संदेश पोहोचविण्याचे काम केले जाते. नुक्कड नाटक हे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक प्रभावी माध्यम आहे. तंबाखू विरोधी संदेश पोहोचवण्यासाठी नुक्कड नाटकाचे आयोजन करण्यात येते. (World No Tobacco Day) याचे उद्दिष्ट तंबाखूच्या वापराचे दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहोचविणे, लोकांना तंबाखूपासून दूर राहण्यास प्रवृत्त करणे व तंबाखू विरोधी कायदे आणि त्यांच्या अंमलबजावणीची माहिती देणे आहे. यामध्ये नाटकात तंबाखूच्या वापरामुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांचे चित्रण करणे, तंबाखूच्या व्यसनातून बाहेर येण्यासाठी उपाययोजना सुचविणे, नाटकाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र आयोजित करून लोकांच्या शंकांचे निरसन करणे आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून तंबाखूच्या वापराचे दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहोचवले जातात आणि त्यांना तंबाखूपासून दूर राहण्यासाठी प्रेरणा मिळेल जागतिक तंबाखू निषेध दिवस हा संदेश देतो की तंबाखू मुक्त जीवनच आरोग्यदायी जीवनाचे रहस्य आहे. तंबाखूला निरोप देऊन आपल्या आणि आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या. तंबाखूच्या व्यसनातून मुक्त होऊन स्वस्थ, निरोगी आणि आनंदी जीवन जगा. तंबाखू सोडल्यामुळे शरीराला मिळणारे फायदे अपार आहेत. त्यामुळे आजच तंबाखूचा त्याग करण्याचा संकल्प करा आणि आरोग्यदायी जीवनाचा स्वीकार करा.
डॉ अभय दातारकर
अधिष्ठाता शा दंत महा. नागपुर
सौजन्य- सामाजिक दंतशास्त्र विभाग